पालघर : तौक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्याला तडाखा बसला असून चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीनं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिवृष्टीनं जिल्ह्यात 13 हजार 289 घरांची, 9 झोपड्याची आणि 10 गोठ्यांची पडझड झाली आहे. तर आश्वासित सिंचनाखालील जवळपास 4 हजार 438 शेतक-यांच्या भात, भाजीपाला, केळी, पपई सारख्या पिकांचं आणि आंबा, चिकू, इतर काही फळ आणि फुल पिकं घेणा-या जवळपास 9 हजार 910 शेतक-यांचं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यातलं 6057.30 हे. आर क्षेत्र बाधित झाल्यानं त्याचा फटका जिल्ह्यातल्या 14 हजार 348 शेतक-यांना बसला आहे.
या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातल्या 53 बोटींचं, 229 जाळयांचं, 164 शाळाचं, 101 अंगणवाडयाचं, 74 ग्रामपंचायत कार्यालयांचं आणि 722 झाडांचं नुकसान झालं आहे. तसचं यात 3 व्यक्तींचा मृत्यु झाला असून 2 व्यक्ती जखमी झाल्यात. आणि जवळपास 8 जनावरांचा मृत्यु झालायं. चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीनं जिल्ह्यात महावितरण च्या 686 एल.टी पोल, 406 एच.टी पोल 6 हजार 189 ट्रांसफार्मरचं आणि 20 डीपींचं नुकसान झालं आहे.