नशेच्या कोड्यात अडकलेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्यासाठी विविध स्तरांवर काम केंल जातं. शासकीय पातळीवर विविध योजना राबविल्या जातात. महाराष्ट्रातील कल्याण येथे वास्तव्यास असलेले मिलिंद रूपचंद पाटील हे नशामुक्तीच्या प्रश्नावर काम करत आहेत. व्यसनाधिनतेची समस्या लक्षात घेता जर परिस्थितीत बदल झाला नाही तर इथून पुढे आणखी वाईट स्थिती नशा करणा-या व्यक्तीची, त्यांच्या कुटुंबाची होऊ शकते. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ५७ वर्ष महाराष्ट्रात व्यसनाविरोधात प्रचार, प्रसार, प्रबोधन करीत आहेत. मंडळाचे मुख्य ध्येय मतपरिवर्तनातून व्यसनमुक्त समाज निर्माण करणे हे आहे. आपण ज्यावेळी एक किंवा अनेक व्यसनांच्या आहारी जातो तेव्हा एकापेक्षा अनेक संकटांना सामोरे जात असतो. व्यसनांमुळे माणसास शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. नशाबंदी मंडळाच्या वतीने विविध उपक्रमा द्वारे व्यसनी पदार्थाचे ( दारू, गुटखा, तंबाखू, अमली पदार्थ ) सेवन आणि त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तंबाखू च्या सेवनाच्या चक्रव्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनापासून प्रतिबंध करणे ही या वर्षी ची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे. अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे युवा पिढीलाना हेतूपूर्वक वेगवेगळ्या आणि आक्रमक रणनीती अंगीकारून नवीन पिढीला तंबाखूजन्य पदार्थांची सवय लागावी यासाठी वेगवेगळ्या जाहिरातींच्या द्वारे तंबाखू उद्योग समूहाकडून मुलांना तंबाखू सेवनाकडे आकर्षित केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून भारतात 5500 युवक दरवर्षी दर दिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात. दर दिवशी भारत देशात 3500 लोक केवळ तंबाखू सेवन केल्याने मरण पावत आहेत. तंबाखूयुक्त मशेरी, जर्दा व तंबाखूच्या धूरात 7000 हून अधिक विषारी रसायने असतात. यामध्ये निकोटीन, हायड्रोजन सायनाइड, अमोनिया, आर्सेनिक, नेप्थेलीन, कॅडमियम, अॅसिटोन, कार्बन मोनोक्साड, डीडाटी सारखे विषारी रसायने असतात. तर तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, मेंदुचा पक्षाघात, गालाचा कर्करोग, गळ्याचा कर्करोग, लेरिक्स, ओरोफरिग्स, हिरड्यांचा कर्करोग, क्षयरोग, पोटाचा कर्करोग, दमा, नपुंसकता, गॅगरीन सारखे आजार होतात. सिगारेट, विडी, हुक्का आणि अन्य धूम्रपानयुक्त तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे फुफ्फुसं, हदय, तसचं अन्य अवयवांना हानी पोहचते. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अशा व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढते. ही खरंच चिंताजनक बाब आहे.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील हे पाच वर्षापासून पालघर जिल्हा व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशात प्रत्येक 16 सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करत. तर दर दिवशी हा आकडा 5,500 मुलांपर्यंत जातो. या व्यसनाच्या दुष्टचक्रा पासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करण्यासाठी तंबाखू मुक्त शाळा अभियान पालघर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होतो आहे. या पार्श्वभूमीवर आता पालघर तालुक्यातील शाळा तंबाखू मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, वाडा तालुक्यांत तंबाखू मुक्त कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. आणि तंबाखू मुक्तची शपथ घेऊन या मोहिमेची सुरुवात होते. व्यसनांना आळा घालणे तसेच व्यसनी व्यक्ती चे मतपरिवर्तन करुन त्यांना निव्यसनी बनविणे यासाठी युवकांपुढे तसेच समाजापुढे व्यसन मुक्तिचा संदेश जावा यासाठी पथनाट्य स्पर्धा, रॅली, पोस्टर प्रदर्शन तसेच तंबाखूच्या प्रतीकात्मक होळीचे आयोजन, माझा अधिकार आरोग्याचा तंबाखूमुक्त परिसराचा, पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनातील विद्यार्थ्यांना निर्व्यसनी व्हा आणि इतरांना निर्व्यसनी राहण्याकरता व्यसनमुक्ती ची शपथ देण्यात येत आहे. व्यसनमुक्ती वर पोस्टर प्रदर्शणाचे पण आयोजन करण्यात येते. दारू आणि इतर व्यसनाचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात येतं यामुळे समाजात व्यसनमुक्तिच्या मुद्द्यावर जनजागृती येईल.
लॉकडाऊनच्या काळात दारू -तंबाकू व इतर ही व्यसनयुक्त पदार्थ सुरवातीच्या काळात उपलब्ध न झाल्यामुळे अनेक व्यसनाधीन व्यक्ती कायमचे निर्व्यसनी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात एक चागला परिणाम दिसून आला. अनेकांचे व्यसन सुटले आहे. सुटत आहे, जी की अत्यंत समाधानाची बाब आहे. व्यसन हा मानसिक आजार असल्यामुळे व्यसनी व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. तसेच नशेच्या पदार्थाच्या सेवनामुळे त्याची प्रतिकार शक्ती कमी होते. त्यासाठी त्याला नियमितपणे समुपदेशन आणि उपचार मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्हातील सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयात तालुका स्तरावर एक व्यसनमुक्ती उपचार केंद्र आणि समुपदेशन केंद्र – विभाग सुरु करणं आवश्यक आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून सरकारने विभाग सुरू करावा अशी मागणी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कडून करण्यात येत आहे.
आज पुरोगामी महाराष्ट्राला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र मद्यमुक्ती कडे वाटचाल करीत आहे हे सकारात्मक पाऊल असेल. लॉक डाऊन नंतर जेव्हा सर्व सुरळीत सुरू होईल तेव्हा उपलब्ध असलेल्या दारू, तंबाखु, अमली पदार्थामुळे कुटुंबाला, समाजाला आणि व्यवस्थेला भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. लॉकडाऊन च्या काळात निर्व्यसनी झालेल्या आणि व्यसनमुक्त होऊ इच्छिनाऱ्या व्यक्तीस उपचार, समुपदेशन प्राप्त झाल्यास तो पूर्ण निर्व्यसनी जीवन जगू शकेल. तसेच तंबाखू सोडण्यासाठी अशा जागा आणि लोकांपासून दूर रहा, ज्या तंबाखू सेवनासाठी प्रवृत्त करतील. जेव्हा तंबाखू सेवनाची इच्छा होते तेव्हा 1 ते 100 अंक मोजणे, पळणे, रशी उडी, प्राणायाम अथवा केमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप इ. पदार्थांचे सेवन करणे तसेच तंबाखू सेवनामुळे शरीरात अस्तित्वात असणारी विषारी रसायने शरीराबाहेर टाकण्यासाठी पाणी प्यावे, मित्रांसोबत आपले विचार, भावना शेअर करणे, सर्व प्रकारचे तंबाखू ( धूम्रपानरहित तंबाखू ) सेवन सोडल्यानंतर गाल, हिरड्या, तोंड, गळा, श्र्वसन नलिका, अन्न नलिका, आणि पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. असे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील याचे मत आहे.