पालघर : शासनानं प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2021 आणि रब्बी हंगाम 2020-21 पासून तीन वर्षासाठी जिल्हयात राबविण्या बाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यात जिल्हयातल्या भात, नागली आणि उडीद या पिकांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रक्कम ही भातासाठी हेक्टरी 45,500, नाचणीसाठी हेक्टरी 20,000 आणि उडदासाठी हेक्टरी 20,000 रूपये इतकी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 टक्के विमा हप्ता भरावा लागेल. 2 टक्क्यांनुसार भातासाठी प्रति हेक्टर 910, नाचणीसाठी प्रति हेक्टर 400 आणि उडीदसाठी प्रति हेक्टर 400 रूपये विमा हप्ता भरावा लागेल.
ही योजना कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतक-यांना ऐच्छिक असून यावर्षी खरीप मध्ये या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जूलै आहे. कर्जदार शेतक-यांनी योजनेत सहभागी न होण्याची आणि विमा हप्ता कर्ज रकमेत वजावट न करण्याची सुचना बँकेला देण्याची अंतिम मुदत नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत आहे.
योजनेची उद्दीष्टे :
नैसर्गिक आपत्ती, किड आ रोगासारख्या अकल्पिक प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, पिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थीतीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांच्या नाविन्यपर्ण व सधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
खरीप हंगामातील जोखीमीच्या बाबी :
हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी हिंवा लावणी झाल्यामुळे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे उत्पन्नात होणारी घट, ही योजना अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकांसाठी आहे, शेतकऱ्याने भरावयाच्या खरीप हंगामतील विमा हप्ता दर खालील प्रमाणे विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के मर्यादीत ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 करिता जोखिमस्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चीत करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं. त्यासाठी तात्काळ आपल्या जवळच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन पालघरचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी केलं आहे.