पालघर : शासनाच्या आदेशानुसार, ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तो जिल्हा स्तर 1 मध्ये आणि स्तर 2 मध्ये येईल. आणि ज्या जिल्ह्यातला पॉझिटिव्हीटी दर हा 5 ते 10 टक्के असल्यास त्याचा समावेश स्तर 3 मध्ये होतो.
त्यानुसार आरटीपीसीआर पॉझिटिव्हीटी दराप्रमाणे पालघर जिल्ह्याचा समावेश हा सध्या स्तर 3 मध्ये होत आहे. जिल्ह्यातला आजचा पॉझिटिव्हीटी दर हा 9.5 टक्के इतका आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात 812 तर वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात 1213 इतक्या एक्टिव केसेस आहेत. जिल्ह्यात आज 212 नव्या रुग्नांची नोंद झाली. 26 जून ला जिल्ह्यातला पॉझिटिव्हीटी दर हा 13.8 टक्के इतका होता. तर 27 जूनला पॉझिटिव्हीटी दर हा 12.9 टक्के इतका होता.
त्यामुळे नागरिकांनी कोविड नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. लक्षणं असलेल्या नागरिकांनी त्वरित चाचणी करावी. तसचं इतरांना देखील प्रवृत्त करावं. रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह असल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी. जेणेकरून वेळेत उपचार करणं शक्य होईल. घरांमध्ये विलगिकरणात असलेल्यांनी बाहेर फिरू नये. त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबियांना तसचं इतर लोकांना देखील बाधा होऊ शकते.
जर नागरिकांनी कोविड नियमांचं काटेकोरपणे पालन केलं नाही तर जिल्ह्यातला पॉझिटिव्हीटी दर वाढू शकतो. आणि जर जिल्ह्यातला पॉझिटिव्हीटी दर वाढला तर मग जिल्ह्यात स्तर 4 चे निर्बंध लावण्यात येतील. आणि एकदा लावलेले निर्बंध हे दोन आठवडे कमी करता येणार नाहीत.
त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं. जेणेकरून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास योग्य नियोजन करता येईल असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केलं आहे.