पालघर : पालघर जिल्ह्यातल्या नालासोपा-यात वसई – विरार महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे एक चार वर्षाचा चिमुकला गटाराच्या मॅनहोल पडून वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेला चोवीस तास उलटून गेले आहेत. मात्र अजूनही मुलाचा पत्ता लागलेला नाहीये. अग्निशमन दलाकडून चिमुकल्याचा शोध सुरुचं आहे.
जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचलं होत. दरम्यान जिल्ह्यातल्या नालासोपा-या मधल्या बिलालपाडयातल्या हनुमान नगर मध्ये राहणा-या रामेश्वर सिंह यांचा चार वर्षाचा मुलगा अनमोल सिंह काल सकाळी खेळत होता. आणि त्या दरम्यान तो बॉल आणण्यासाठी गेला असताना तिथं असलेल्या गटारीचं झाकण उघडं असल्यानं तो त्या मॅनहोल मध्ये पडून वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताचं, स्थानिक नगरसेविका दीक्षा घरत यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून घेतलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पावसाच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं तो त्यात वाहून गेला. या घटनेला चोवीस तास उलटून गेले असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून अजूनही शोध कार्य सुरु आहे.
अनमोल शोध न लागल्यानं त्याच्या कुटुंबीयांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. जर वसई – विरार शहर महानगरपालिके कडून या गटारांची झाकणं लॉक केली गेली असती तर अशी घटना घडली नसती. त्यामुळे यासाठी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप अनमोल चे आजोबा जय प्रकाश सिंग यांनी केला आहे.