पालघर : जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात झालेल्या विक्रमी पावसामुळे वैतरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे मनोर गावाला पुरानं विळखा घातला होता. आणि त्यामुळे पालघर – मनोर रस्ता वाहतुकीसाठी कालपासून बंद होता.
पालघर जिल्ह्यातल्या तालुक्या मधल्या कोहोज किल्ल्याच्या खालील शेलटे इथला बंधारा ( पाझर तलाव ) लीक झाला असून बंधाऱयाला मोठं भगदाड पडलयं. स्थानिक महसुल विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांकडून जवळपास 300 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलयं. हे 500 लोकवस्तीच गाव असून काहींना उंचवट्याच्या भागात सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला प्रशासनानं दिलाय. या भागातल्या घराचं तसचं भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवानं अजून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये.
पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी पावसाचा जोर जास्त असल्यानं आणि तिथली पूर सदृश्य परिस्थिती पाहता एनडीआरएफ च्या दोन तुकड्यांना जिल्ह्यात पाचारण करण्यात आलं आहे. या दोन्ही टीम सध्या मनोर मध्ये दाखल झाल्या असून एका टीम ला वाड्याला पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातल्या झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांवर झाडं पडली असून रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं, अनेकांच्या शेतात पाणी साचलं असल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर बऱ्याच रस्त्यांवर दरड कोसळली असून ते सुरळीत करण्याचं कामं सुरु आहे.
जिल्ह्यात आज सरासरी 178.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जव्हार, विक्रमगड, वाडा, मोखाडा या तालुक्यांत सर्वांत जास्त पावसाची नोंद झाली आहे.