जव्हार / संदीप साळवे : पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य वनसृष्टीने नटलेल्या जव्हार तालुक्याला गेल्या दोन तीन दिवसांपासुन पडणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. समुद्र सपाटीपासून १६०० फूट उंचावर जव्हार आहे. ह्या भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे,परंतु उतार असल्यामुळे पाणी साचून राहत नव्हते. पण यंदा जव्हारला हि पूर स्थितीचा अनुभव पाहायला मिळाला आहे. पाणी वाहून जाणाऱ्या ठिकाणावर, गटारांवर जव्हार नगरपरिषदेच्या हद्दीत मातीचा भराव टाकुन झालेली अतिक्रमणे पुराला कारणीभूत ठरली आहेत.
यंदा पावसाने कहर केल्याने जांभुळविहिर परिसरात काहींच्या घरात पाणी शिरले, ठिकठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले, भुस्खलन झाले, दरडी कोसळल्या तर चोथ्याची वाडी, धानोशी रस्त्याची मोरी वाहुन गेल्याने तेथील रामखिंड, डोंगरपाडा, पाथर्डी, कडाची मेट, खिडसा या गावांचा शहरी भागाशी असलेला संपर्क तुटला आहे. यामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले पिंपळशेत खरोंडा हद्दीतील माडविहरा, हुंबरण या गावांचा हि संपर्क तुटला आहे. झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने माडविहरा गावातील रस्त्याची मोरी वाहुन गेली आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या दळणवळणाचे मोठे हाल झाले आहेत.
तालुक्यातील शिंगारपाडा ते ओझर रस्त्यावरील मोरी तुटल्या आहेत. त्यामुळे ह्या गावात येणारी ओझर बस सेवा बंद आहे. ओझर,शिंगारपाडा, माडविहरा हेदीचापाडा येथील नागरिकांना दळवळणा अभावी जव्हारला जाण्यासाठी 5 किलोमीटर दूर पायपीट करत पिंपळशेत येथे जाऊन प्रवास करण्याची वेळ ओढवली आहे. रस्त्याची मोरी तुटल्या कारणाने परिवहन मंडळाची जव्हार आगाराची बस ओझरला न जाता हेदीचापाड्यालाच फिरून जाते. आणि वस्तीची मुक्कामी गाडी मेढा मार्गाने ओझरला येते. त्यामुळे रात्रीच्या वेळी ८ ते ९ वाजता माडविहरा, शनिवारवाडा, हेदीचापाडा अशा ५ किलोमीटर रात्रीची पायपीठ करत प्रवासांना पायी घर गाठावे लागत आहे.
दळवळणाच्या गैरसोय अभावी आदिवासी बांधवांना हाल सोसावे लागत आहेत. पिंपळशेत खरोंडा या गावांना वाडा आगाराची येणारी बस सुध्दा रस्त्या अभावी गावांपर्यंत न जाता आखरा गावापर्यंतच जाते. त्यामुळे ग्रामीण भाग असलेल्या पिंपळशेत खरोंडा गावाचा दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माडविहरा गावाजवळील मोरी पाण्याने वाहुन गेल्याने माडविहरा ,हुंबरण गावांचा संपर्क तुटला आहे. येथील दळवळण, बससेवेचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.