जव्हार / संदीप साळवे : पालघर जिल्ह्यातील जव्हार साकुर रस्त्यावरील धानोशी जवळचा रस्ता मोठ्या पाण्याच्या प्रवाहमुळे वाहुन गेल्या यामुळे येथील वाहतूक बंद होवून जवळपास १० ते १२ गावपाड्यांचा रस्ता बंद झाला आहे. या घटनास्थळाची पाहणी आमदार सुनिल भुसारा यांनी केली असून या रस्त्याचे आणि मोरीचे नुतनीकरण होईल तेंव्हा होईल मात्र सध्या तात्काळ युद्धपातळीवर या मोरीची दुरुस्ती करावी असे आदेश बांधकाम विभागाला आमदार भुसारा यांनी दिले आहेत. यावेळी जिल्हा परीषदेचे शाखा अभियंता विष्णु बोरसे यांनी हे काम लवकरात लवकर करण्याची ग्वाही दिली.
मागील काहि दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील अनेक गावाचे, शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये वाडया मधील शेलटे येथील फुटलेला मोठा बंधारा, विक्रमगड तालुक्यातील शेवते गावात पाणी घुसून झालेले नुकसान तर जव्हार तालुक्यातील धानोशी येथील मोरी वरील अर्ध्याहून अधिक रस्ता वाहुन जावून बंद झालेली वाहतूक या सर्व घटनांची पाहणी आमदार सुनिल भुसारा यांनी केली असून चारही तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना लोकांच्या अडचणी दुर करण्याच्या याशिवाय नुकसान झालेल्या शेती ,घरांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश भुसारा यांनी दिले आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर ,विक्रमगड विधानसभा अध्यक्ष कमळाकर धुम, युवा तालुकाध्यक्ष उपसरपंच संदीप माळी, विद्यार्थी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निशिकांत बुधर, अमित डोके आदि पदाधिकारी आणि तहसीलदार भला उपस्थित होते.