पालघर : पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील वैतरणा नदीला प्रचंड पुर आला होता. मनोर मधल्या टाकवाल इथं पुराच्या पाण्याच्या जवळपास 50 फुटवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम करण्यासाठी 2 लाईनमैन गेले असताना ते वर वीजतारांवर अडकले. या दोन्ही लाईनमैनला NDRF च्या टीमनं रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढलं.
पालघर वीज विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांनी माहीती देताना सांगितलं की, पालघर जिल्ह्यात 21 तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे वैतरणा नदीला आलेल्या पूरामुळे मनोरच्या ३३/२२/११ के.व्ही. वीज उपकेंद्रातून निघणा-या ढेकाळे उच्चदाब वीज वाहिनीचे ( ११ के.व्ही ) २ पोल टाकवाल खडीमशीनपाडा इथं जमीनीतून उन्म़ळून पडले होते. त्यामुळे दुर्वेस, सावरा, हालोली, ढेकाळे, साये, कुडे, सातिवली, साखरे, दहिसर या १५ गावां मधल्या ६५ वीज रोहित्रांवरील २५०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान शुक्रवारी जेव्हा पालघर वीज विभागाचे अधिकारी ठेकेदारांच्या लाईनमैन ना घेउन विजेचे पोल आणि वीजेच्या तारांची दुरुस्ती करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, पुराच्या पाण्यामुळे पोल पडलेल्या ठिकाणी पोहचणं आणि तिथं दुरूस्तीचं काम करणं अत्यंत कठिण आहे. काही वेळानं पुराचं पाणी काहीसं ओसरल्यामुळे पडलेले पोल पुन्हा उभारण्यात आले. मात्र नदीच्या वरून गेलेल्या विजेच्या तारांना बदलणं कठिन होतं. त्यानंतर ठेकेदारांच्या लाईनमैननी नदीच्या पाण्यावरून नादुरुस्त विजेच्या तारांनावर लटकुन नव्या तारांना एका पोलवरुन दुसर्या पोलवर घेउन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं यश आलं नाही. आणि त्या दरम्यान ते दोन लाईनमैन विजेच्या तारांनावर अडकले.
त्यानंतर वीज विभागाच्या अधिका-यांनी NDRF ची मदत मागितली. NDRF च्या टीमनं घटना स्थळी पोहचून अगोदर तारांनावर अडकलेल्या दोन्ही लाईनमैन ना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढलं. आणि त्यानंतर NDRF च्या टीमच्या मदतीनं ६५ तासांमध्ये पडलेले पोल आणि तुटलेल्या उच्चदाब वीज तारां बदली करण्यात आल्या.