पालघर : पालघर जिल्ह्याला समुद्रकिना-यांचं वैभव लाभलं असून या समुद्रकिना-यांवर प्रवासा दरम्यान अनेक परदेशी पक्षी हजेरी लावत असतात. सध्या चिंचणी समुद्रकिनारी मास्क्ड बूबी हा पक्षी आढळून आला आहे.
जिल्ह्यातल्या पश्चिम किनारपट्टी भागातल्या चिंचणी गावामधल्या समुद्रकिनारी मास्क्ड बूबी म्हणजेचं मोठा समुद्रकावळा हा पक्षी आढळून आला आहे. दोन दिवसापूर्वी किनारपट्टी भागांत वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे समुद्रामध्ये ही याचा चांगलाच परिणाम झाला होता. त्या कारणामुळे खोल समुद्रामधला हा पक्षी वादळी वाऱ्याच्या प्रवाहानं किनारपट्टीवरील भागात भरकटून आला असावा असं पक्षी निरीक्षकांचं म्हणणं आहे.
मोठा समुद्रकावळा हा सुलीफॉर्मेस वर्गातील सुलीडे कुळातला एक पक्षी आहे. याला इंग्रजीत Masked booby ( मास्क्ड बूबी ) तर हिंदीमध्ये जलकौवा, पानकौवा असं म्हणतात. हा पक्षी आकारानं राजहंसापेक्षा मोठा आहे. प्रामुख्यानं शुभ्रवर्णाचा, पंखाची किनार काळी, पिवळी, नारिंगी किवां निळसर असते. याच्या तोंड आणि कंठावरील उघड्या कातडीचा रंग काळा-निळा असतो.
भारतातामध्ये हे पक्षी विणीनंतर, पाकिस्तानच्या किनारपट्टीवर तसचं वर्षा – ऋतूतल्या वादळातून ते भारताचा पश्चिम किनारा आणि श्रीलंकेपर्यंत येतात. तर मालदीव बेटा वरही हे पक्षी आढळतात.
या पक्षाला आकाशात उडता येत नसल्यानं चिंचणी गावातले पक्षी मित्र प्रविण बाबरे यांनी त्याला डहाणु वनविभागाच्या स्वाधीन केलं आहे.