जव्हार : 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जव्हार शहरातील, पाच बत्ती नाका येथे रहिवासी असलेल्या एका नागरिकाने आपली दुचाकी एक्टिवा स्कुटी शहरातील एसटी स्टँड जवळील राज महल हॉटेल समोर उभी केली होती. काही वेळानंतर येथे दुचाकी दिसली नाही म्हणून दुचाकीच्या मालकाने जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व्हावा म्हणून फिर्याद दिली. यावर जव्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 70/ 2021 भारतीय दंड विधान संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जव्हार येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी हरवलेल्या ठिकाणी जाऊन तात्काळ भेट दिली. यानंतर पोलिस ठाण्यातून दुचाकी शोधण्याकरिता एक पथक नेमण्यात आले. या पथकाने पाच बत्ती नाका येथे जाऊन माहिती प्राप्त केली असता दुचाकी ही विक्रमगड येथे असल्याची माहिती मिळाल्याने, जव्हार येथील पोलिस पथकाने तेथे जाऊन एका 23 वर्षीय आरोपी यास 23 जुलै 2021 रोजी अटक केली. या आरोपीकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्या आरोपीकडे एकूण पाच अॅक्टिवा व 2 जुपीटर स्कुटी मिळून आल्या आहेत. आरोपी यांच्याकडून 7 वाहने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याने सराईत दुचाकी चोर जव्हार पोलिसांच्या धडक कारवाईने पकडण्यात आल्याने तालुक्यामध्ये पोलिसांच्या या धडक कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.