पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार पूर्वेककडील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या आयसीआयसीआय ( ICICI ) बँकेमध्ये रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान दोन दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करत दरोडा घातला. यात विरोध करणाऱ्या एका कर्मचारी महिलेचा मृत्यू झालाय. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृत्यू झालेली महिला ही बँकेची डेप्युटी मॅनेजर असल्याचं तर जखमी महिला ही बँकेत कॅशियर असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान दरोडा टाकून बँकेतून सोनं आणि कॅश घेऊन पळून जाताना एक दरोडेखोर नागरिकांच्या हाती लागला. आणि त्याला नागरिकांनी बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. किती रुपयांचा दरोडा पडला या बाबत पोलिसांनी अजून कोणतीही माहिती दिली नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.