पालघर : कोरोना संकटाच्या या काळात जवळपास दीड वर्षापासून मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या या शाळा बंद आहेत. काही शाळा ह्या ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवत आहेत. मात्र पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागांत या ऑनलाईन पद्धतीनं शिकवणं शक्य नाही. कारण या भागांमध्ये एकतर लोकांची अर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं सर्वांना आपल्या मुलांसाठी मोबाईल घेणं शक्य होतं नाही. आणि अतिदुर्गम भागातली दुसरी महत्त्वाची समस्या अशी की या भागांत नेटवर्किंग चा मोठा प्रॉब्लेम आहे. मग अशा परिस्थितीत मुलांना इथं ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देणं शक्यचं नाही. मग अशा ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी पेन्स सहयोग फाउंडेशन ही संस्था पुढे सरसावली आहे.
पेन्स सहयोग फाउंडेशन ही संस्था पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागांत गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं काम करत आहे. मग शिक्षण असो, आरोग्य असो किंवा कौशल्य विकास असो या प्रत्येक क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे. जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागांत जिथं इंटरनेट नाहीये, जिथं मोबाईल ची सुविधा नाहीये अशा भागांत शिक्षण ठप्प आहे. कारण कोरोनामूळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीयेत आणि शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकत नाहीत. मग यावर उपाय काय . तर शिक्षणापासून वंचीत असलेले बरेच प्राथमिक शाळेतले विद्यार्थी या संस्थेला आढळून आले. मग अशा विद्यार्थ्यांसाठी गुरुकिल्ली प्रायमरी हा उपक्रम या संस्थेनं हाती घेतला.
गुरुकिल्ली प्रायमरी या उपक्रमात गावाच्या किंवा पड्याच्या बाहेरून स्वयंसेवक न आणता गावातल्याच आणि पाड्यातल्याचं शिक्षित मोठ्या मुलांना स्वयंसेवक बनवून ही त्यांना प्रायमरी च्या म्हणजेच 1 ली ते 4 थी पर्यंतच्या मुलांना शिकवण्यासाठी तयार केलं गेलं. डहाणू, विक्रमगड, वाडा, मोखाडा,
आतापर्यंत डहाणू ,पालघर मधल्या ग्रामीण भागातल्या जवळपास 170 शाळांनी या उपक्रमात सहभागी होऊन 5 हजारांपेक्षा जास्त मुलांना शिक्षणाचा लाभ मिळवून दिला आहे. यासाठी ग्रामीण भागातले शिक्षक, ज्युनिअर स्वयंसेवक आणि पेन्स सहयोगी फाऊंडेशनचे स्वयंसेवक यांनी मोठं योगदान दिली असल्याची माहिती पेन्स सहयोगी फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश सावे यांनी दिली.
पेन्स सहयोग फाउंडेशन या संस्थेनं राबवलेल्या गुरुकिल्ली प्रायमरी या उपक्रमामुळे प्रत्येक घरांच्या भिंतींना शाळेचं रूप आलं आहे. विद्यार्थी शाळेपर्यंत पोहचू शकत नाही मात्र शाळा विद्यार्थ्यांच्या घरा पर्यंत पोहचू शकते याचं एक सुंदर उदाहरण या संस्थेनं जगापुढे सादर केलं आहे.