पालघर : भीषण महापुरानं कोकण परिसरातली हजारो कुटुंबे उद्वस्त झाली आहेत. वीज नाही, पाणी नाही, खायला अन्नही नाही आणि वरुन पडणारा पाऊस कोकण वासियांच्या धैर्याची, जिद्दीची आणि संयमशीलतेची कसोटी पाहत आहे की काय अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शक्य ती मदत करा असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं.
त्या अनुषंगानं पुरातून सुरक्षितपणे बाहेर आलेल्यांना जीवनावश्यक वस्तुंची भासणारी गरज लक्षात आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते खेड, चिपळूण पूरग्रस्त भागात लोकांना मदत करण्यासाठी पोहचले. आणि तिथं राहून त्यांनी पक्षाचे पालघर, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालघर विधानसभेतर्फे पूरग्रस्त भागातल्या बांधवांना गहू, तांदूळ, डाळी, तेल, बिस्कीट, ब्लॅंकेट्स, फिनेल, पिण्याचे पाणी बॉटल, कोलगेट, बॅटरी, मेणबत्ती, मॅचिस, लहान मुलांचे कपडे, घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू अशा जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं.
पूरग्रस्त भागात तीन दिवस मदत कार्य करून, समीर मोरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम आणि जिवंत उदाहरण लोकांसमोर ठेवलं आहे. त्यामुळे समीर मोरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आम्ही पुन्हा दोन दिवसांनी पूरग्रस्त भागात जाणार आहोत. कारण महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना शक्य तितकी मदत करा आणि मदतीसाठी आपल्याकडून कुठलीही कुचराई होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन समीर मोरे यांनी केलं आहे.