जव्हार : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्या मध्ये असलेल्या पाथर्डी ग्रामपंचायतीत घरकुल योजनेतील ड प्रपत्र नुसार 40 पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आल्यानं घरकुल घोटाळा उघडकीस आला आहे. अपात्र ठरवलेल्या या सर्व लाभार्थ्यांनी मनसे ची मदत घेऊन जव्हार पंचायत समिती कार्यालयात शेकडोंच्या संख्येने धडक मोर्चा काढला.
आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन हे पूर्णपणे शासकीय योजना आणि अनुदान या दोन घटकांवर अवलंबून आहे. असे असताना पाथर्डी ग्रामपंचायत मधील 40 घरकुल लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे. यासाठी देण्यात आलेले तांत्रिक कारण हे अतिशय जुजबी असल्याचं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गटविकास अधिकारी यांची भेट भेटली. आणि याबाबत विचारणा केली. घरकुल सर्व्हे हा कसा झाला, कधी झाला याबाबत या लाभार्थ्यांना अन्नभिन्न ठेवण्यात आले होते. सर्व्हे करण्यात आलेल्या व्यक्तीने कोणत्या निकषांवर सर्व्हे केला हा एक औत्सुक्य असण्याचा भाग आहे.
त्याशिवाय एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळाला असून 20 एकर जमीन असणाऱ्या लाभार्थ्याला देखील घरकुल लाभ देण्यात आला आहे यावेळी निकष आणि अटी शर्ती गेल्या कुठे असा खोचक सवाल देखील यावेळी आंदोलन कर्त्यांनी उपस्थित केला. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि निवाऱ्याची नितांत गरज असणाऱ्या नागरिकांना ही घरकुल योजना अपेक्षित असताना केवळ हित संबंध जपण्यासाठी आणि इतर काही लोभामुळे सर्व्हे होत असताना जाणीव पूर्वक या 40 लाभार्थ्यांना डावलण्यात आले असल्याची शंका आता निर्माण झाली आहे.
1 ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा अस्तित्वात येऊन 7 वर्षांचा काळ लोटला. या कालावधीत सर्व काही सुरळीत असणे अपेक्षीत होते. परंतु शासन प्रशासन स्तरावरील उदासीनतेमुळे अनेक विकासाच्या योजना राबविल्या गेल्या पण प्रत्यक्षात मात्र अमलात आल्याचं दिसून येत नाही. पाथर्डी ग्रामपंचायत मधील अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे यासाठी मागणी करण्यात आली असून जिल्हास्तरावर देखील हा विषय नेऊन न्याय देणार असल्याचे मनसे शिष्टमंडळाने बोलताना सांगितले. गोर गरीब जनतेला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसून यापुढे या पेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे शिष्टमंडळाने दिला आहे.
पाथर्डी ग्रामपंचायत मधील ड प्रपत्र मधील 40 अपात्र घरकुल लाभार्थी यांचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मांडला असून त्याबाबत चौकशी करून जिल्हास्तरावर घरकुल लाभ देता येईल का? राहिलेल्या तसेच अपात्र लाभार्थ्यांना घरकुल योजना देता येईल का, याबाबत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं गट विकास अधिकारी समीर वाठारकर यांनी सांगितलं.
जव्हार पंचायत समिती क्षेत्रातील पाथर्डी ग्रामपंचायत येथील 40 घरकुल लाभार्थ्यांना अपात्र केल्याचे समजताच मनसे कडून धडक मोर्चा नेऊन चौकशी केली असून याबाबत पालघर जिल्हा कार्यालय येथे देखील आम्ही जाणार असून,गरीब आणि गरजू लाभार्थ्यांला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी दिला आहे.