पालघर : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मधल्या पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयातली एक्स-रे ही अत्यावश्यक सुविधा दोन दिवसांपासून लाईट अभावी बंद आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण निदान करण्यासाठी एक्स-रे सुविधा अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असते. मात्र ही सुविधा बंद झाल्यानं तालुक्यातल्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
हे रुग्णालय जव्हार, मोखाडा ,विक्रमगड या भागातल्या रुग्णांना प्रथम संदर्भ सेवा रुग्णालय म्हणून सेवा देत आहे. या भागांमध्ये नियमितपणे विद्युत पुरवठा खंडित होणं, रुग्णालयात रुग्ण निदान करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या यंत्रसामुग्रीची देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे न होणं यामुळे अश्या अडचणी निर्माण होतायेत.
एखाद्या रुग्णाचा अपघात झाल्यास हात, पाय मोडणं यासारखे प्रकार घडत असतात. अशावेळी योग्य निदान होण्यासाठी एक्स-रे चा आधार घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांवर उपचार करणं सोपं जात. मात्र या रुग्णालयातली एक्स-रे सुविधा ही विद्युत पुरवठया अभावी बंद पडल्यानं रुग्णांचे हाल व्हायला लागलेत. ही सुविधा लवकरात लवकर पूर्ववत व्हावी आणि रुग्णांचे वेळेवर उपचार व्हावेत यासाठी रुग्णालय प्रशासनानं सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रुग्णालयात होत असलेला विद्युत पुरवठा महावितरण कंपनीच्या पोल वरून काही तांत्रिक अडचणीमुळे बंद झाला आहे. त्याबाबत तक्रार केली असून विद्युत पुरवठा पूर्ववत होताच एक्स रे सुविधा अविरतपणे चालू होणार असल्याची माहिती पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ.रामदास मराड यांनी दिली आहे.