पालघर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधीसेवा प्राधिकरण ठाणे अनिल पानसरे यांच मार्गदर्शनाखाली वसई न्यायालयात लोकन्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या लोक अदालतीमध्ये दिवाणी स्वरुपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची तसचं दाखल पूर्व प्रकरणं अशी 1154 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आलीत. मोटार अपघात नुकसान भरपाईच्या 18 प्रकरणामध्ये 1 कोटी 46 लाख 92 हजार भरपाई मंजुर करण्यात आली. तर ग्रामपंचायत क्षेत्रातल्या थकीत असलेल्या घरपट्टीत 16 लाख रुपयांची तडजोड करण्यात आलीय.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 तथा वसई तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष सुधीर देशपांडे यांनी लोकांनी आपसातील असलेले किरकोळ स्वरुपाचे दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक वाद प्रकरणं, समज-गैरसमज अशा काही करणांमुळे दुभंगलेले संसार अशी प्रकरणं समोपचारानं मिटविण्यासाठी लोकन्यायालय हे उत्तम साधन असल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन ही त्यांनी केलं.