पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार मध्ये कोरोनाच्या भीतीनं मुलींनी वडिलांचा मृतदेह तीन दिवस घरातचं ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्रूकलीन पार्कमध्ये हरिदास सहारक, विद्या सहारकर, स्वप्नल सहारकर आणि त्यांची पत्नी हे राहत होते. हरिदास हे रेशनिंग रिटायर ऑफिसर होते. १ ऑगस्ट ला त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र कोरोनाच्या भितीने त्यांच्या परिवारानं कोणालाही त्याची कल्पना दिली नव्हती. आपल्या वडिलांना कोरोना झाला असावा आणि हे जर आपण बाहेर कुणाला सांगितलं तर आपणाला ही क्वारंनटीन करतील या भीतीनं १ ऑगस्ट पासून वडिलाचा मृतदेह राहत्या घरातल्या बेडवरच ठेवण्यात आला होता. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून मृतदेहाच्या शेजारी, डांबर गोळी, कापूर, अगरबत्ती लावून सर्व कुटुंब हे घरातच मृतदेहा शेजारी बसून होत.
वडील आणि बहिणीच्या मृत्यूनंतर तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न :
त्यानंतर मंगळवारी विद्या हिनं गोळ्या घेऊन समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर बुधवारी सकाळी अर्नाळा समुद्रकिनारी स्वप्नल हिनं देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी तिला पाहिलं. आणि ती बुडत असताना स्थानिकांच्या आणि अर्नाळा सागरी पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला.
वडिलांच्या पेन्शन वर घर चालत होत. पण घरात कोणीही कमावत नसल्यानं त्यांनी हे पाउल उचललं असावं असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.