पालघर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पालघर तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यात 2 ऑक्टोबरपासून विविध ठिकाणी कायदेविषयक शिबीराचं आयोजन करण्यात येत आहे.
याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रमा अंतर्गत आज पालघर जिल्ह्यातल्या केळवे गावात पालघर विधी सेवा समिती आणि केळवे ग्रामपंचायत यांच्या तर्फे पालघर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालघर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष गुल्हाने यांनी आपल्या न्याय हक्कासाठी दाद कशी मागावी, गरजूंना विधी सेवा समिती मार्फत मोफत सहाय्यक सल्ला कसा मिळू शकतो या विषयी मार्गदर्शन केलं. तसचं इतर वकिलांनी उपस्थितांना महिलांसाठी असलेले कायदे, पर्यावरण विषयक असलेले कायदे, लोकन्यायालय याविषयी मार्गदर्शन केलं.
यावेळी केळवे ग्रामपंचायत, विधी सेवा समिती पालघर, कादंळवण कक्ष, केळवे पर्यावरण संवर्धन मंडळ, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे विधी स्वंयसेवक आदी उपस्थित होते.