पालघर : पालघर जिह्यात सामाजिक क्षेत्रात आपल्या सातत्यपूर्ण कामाच्या माध्यमातून सतत जनतेच्या प्रति संवेदना जपणारे, कोविड काळात हजारो लोकांना विविध स्वरूपाचं सहकार्य करणारे निर्धार संघटनेचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते कुंदन संखे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त मरणोत्तर अवयव दानाचा निर्णय घेवुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. आणि त्यांनी आपला अवयव दानाचा फॉर्म पालघरचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
वेगवेगळ्या गंभीर आजाराच्या व्यक्तींना प्रत्यारोपण करण्यासाठी अवयव न मिळाल्यानं मृत्यूला सामोरे जावं लागतं. समाज जरी आधुनिकतेकडे जात असला तरी अवयवदानासाठी कोणीही पुढे येत नाही. मात्र कुंदन संखे यांनी अवयव दानासाठी घेतलेल्या पुढाकारानं इतरांनाही प्रेरणा नक्कीच मिळू शकेल. आणि हतबल झालेल्या रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होईल असा विश्वास आरोग्य विभागाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनाच्या आजारानं आपल्याला बरंच काही शिकविलं असून मानवतेच्या दृष्टिकोनातून नेहमीच समाजाला दिशा देण्याऱ्या गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजेत. आणि यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी पुढे येऊन आपलं सामाजिक योगदान देण्याची गरज असल्याचं मत संखे यांनी व्यक्त केलं.