पालघर : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं 100 टक्के लसीकरण करून द्वितीय सत्रापासून महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याच्या उद्देशानं युवा स्वास्थ्य अभियान हाती घेतलं आहे. हे अभियान २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे.
पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे सदर या अभियानाची माहिती देताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलेले हे अभियान खूपच कौतुकास्पद आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज द्वितीय सत्रापासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी मदत होणार आहे.
कोकण विभागीय शिक्षण सहसंचालनालयाचे शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांसाठी टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. आणि पालघर जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये डॉ. किरण सावे (पालघर तालुका), डॉ. सोमनाथ विभूते (वसई- विरार), डॉ. ए. एस. कुलकर्णी (डहाणू तालुका), डॉ. बी. ए. राजपूत (तलासरी तालुका), डॉ. एन. के. फडके (वाडा तालुका), डॉ. विनोद सोनावणे (विक्रमगड तालुका), डॉ. एम. आर. मेश्राम (जव्हार तालुका), डॉ. एल. डी. भोर (मोखाडा तालुका) आदी प्राचार्यांची या अभियानासाठी कोकण विभागीय सहसंचालनालया मार्फत तालुका समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातल्या कोणत्याही महाविद्यालयात शिक्षण घेणार्या तसचं जिल्ह्याच्या बाहेर शिक्षण घेणाऱ्या मात्र पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या सर्वच पात्र विद्यार्थ्यांनी आणि अध्यापकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉ. किरण सावे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केलं आहे. या अभियानाअंतर्गत १८ ते ४५ वयोगटातील एकही डोस न घेतलेल्या आणि अभियान कालावधीत द्वितीय डोस घेण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्रामुख्याने केले जाणार आहे. याशिवाय डोस शिल्लक राहिल्यास परिसरातील संबंधित वयोगटातील नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतात.
पालघर जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या विचारात घेता ही लसीकरण मोहीम पहिल्या दोन दिवसातच पूर्ण करणे शक्य आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि २५ ते २६ ऑक्टोबर या दोन दिवसाच्या कालावधीत १०० टक्के लसीकरण करण्यासाठी सामाजिक जबाबदारीतून आपल्या पातळीवर विशेष प्रयत्न करावेत असं आवाहन डॉ. किरण सावे यांनी केलं आहे. सर्व महाविद्यालया मध्ये समन्वय साधण्याचं काम सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रा. महेश देशमुख पाहणार आहेत.
युवा स्वास्थ्य अभियानाअंतर्गत पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात पालघर तालुक्या मधल्या सोमवारी 72 विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे.