पालघर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( maharashtra state rural livelihood campaign ) उमेद ( umed ) अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या स्वयंसहायता गटाच्या महिलांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री केंद्राचं उद्घाटन आज पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्तानं जिल्ह्याल्या महिलांना त्यांच्या कौशल्य आणि पाककृती साठी चांगली संधी उपलब्ध होणार असून जिल्हा परिषदे मार्फत सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांनी यावेळी केलं.
जिल्हा परिषदेच्या इमारतीत स्वयंसहायता गटाच्या महिलांना प्रदर्शन आणि विक्री साठी सभागृह उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या सभागृहात हे पहिलेचं प्रदर्शन भरविण्यात आलं असून २५ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर या काळात हे प्रदर्शन सुरू असणार आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, पालघर या तालुक्या मधले स्वयंसहायता महिलांचे गट सहभागी झाले असून यात दिवाळी फराळ, पणत्या, विविध प्रकारचे तोरण, आकाश कंदील आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व समिती सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक तुषार माळी, सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थितीत होते.