पालघर : रोजगारानिमित्त जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांत स्थलांतरीत झालेल्या आणि विटभट्टीवरील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिनं जिल्ह्यात दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून अशा स्थलांतरीत मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिराला जिल्ह्यात आज सुरुवात झाली.
आजपासून दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी हे आरोग्य तपासणी शिबीर विटभट्टी, झोपडपट्ट्या, कंस्ट्रक्शन साईट यासारख्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात लहान मुलं, वृद्ध, गरोदर माता, पुरुष सर्वांचीच तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार देण्यात येत आहेत.
पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात विटभट्टी आणि बांधकाम व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरीत होऊन आलेले असतात. अशा स्थलांतरीत होऊन आलेल्या लोकांचं अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातुन सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. सर्वेक्षणाअंती अंगणवाडी सेवेचा लाभ घेणारी काही कुटुंबे जिल्हांतर्गत स्थलांतरीत होऊन आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यात गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, ० ते ६ वर्षे वयोगटातल्या बालकांचं प्रमाण हे मोठं आहे. अशा लाभार्थ्यांना कार्यक्षेत्रातल्या अंगणवाड्यातून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सेवा पुरविण्यात येत आहेत.
मात्र रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या लोकांची तिथं राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता विषयक बाबी अपुऱ्या असल्यानं त्याचा परिणाम लाभार्थ्याच्या आरोग्यावर होत आहे. याचाचं एक परिणाम म्हणुन बालकांच्या कुपोषणामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व स्थलांतरीत लाभार्थ्यांची दर महिन्यातून किमान एक वेळा आरोग्य तपासणी होण्याच्या अनुषंगानं जिल्ह्यात दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी स्थलांतरीत लाभार्थ्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात यावेत अशा सुचना ही पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या आहेत.