पालघर : पालघर जिल्ह्यातल्या केळवे इथल्या सुप्रसिद्ध शितलादेवीच्या मंदिरात गुरुवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळीच्या निमित्तानं संपूर्ण मंदिरात आणि मंदिराच्या परिसरात 5 हजार दिवे लावून विलोभनीय आकर्षक रोषणाई करण्यात आली होत. त्यामुळे हा दीपोत्सव लोकांचा आकर्षणाचा विषय ठरला. बऱ्याच लोकांनी ही सुंदर रोषणाई लावली.
केळवे गावातल्या मुधकर इनामदार यांनी या परंपरेला सुरुवात केली होती. आणि गेल्या 52 वर्षांपासून या कुटुंबियांनी ही परंपरा अखंड सुरू ठेवली आहे. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हा दीपोत्सव करण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे यंदा ही गावकरी आणि इनामदार कुटुंबियांनी शितलादेवी च्या मंदिरात 5 हजार दिवे लावून आकर्षक अशी रोषणाई केली.
पौराणिक पार्श्वभूमी :
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले.
या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.
दीपोत्सव :
या विशेष दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक देवाला अर्पण करतात. याला अन्नकोट असे म्हटले जाते. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात.