पालघर : लायन्स क्लब ऑफ़ तारापुर, सुमीटोमो केमिकल्स, दिगांत स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्या मधल्या पाणी टंचाईग्रस्त गोंदे, वडपाडा, सातुरली या गाव आणि पाड्यांमध्ये नुकताच पाणी उचल प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यांतल्या अतिदुर्गम भागांत मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे ही पाणी टंचाईची समस्या लक्षात घेत अतिदुर्गम भागातल्या मोखाडा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून लायन्स क्लब सोबत मिळून सुमीटोमो केमिकल्स आणि दिगांत स्वराज्य संस्था विविध पाणी पुरवठयाच्या योजना इथं राबवत आहे. त्याचबरोबर इथल्या गावांमध्ये सौर उर्जेच्या सहाय्यानं नागरिकांना पिण्याचं पाणी आणि शेतीस उपयुक्त पाणी पुरविलं जात आहे. तर पाणी साठवण्यासाठी ८००० लिटर क्षमतेचे साठवण हौद, फिल्टर संच ही नागरिकांना देण्यात आले आहेत. या उपक्रमांत ग्रामस्थांनी श्रमदान आणि वेळोवेळी सहकार्य केलं आहे. या योजनांसाठी जवळपास ५६ लाख रुपयांचा निंधी वापरण्यात आला आहे.
यावेळी डिस्ट्रिक्ट गर्ह्वनर ला.के.मुद्दसर, हेमंतराज सेठीया, अजय हवेलिया, सुमीचोमो केमिकल्सचे डॉ.प्रकाश देसाई, राव आणि इतर पदाधिकारी, लायन्स क्लब ऑफ तारापुर चे सदस्य, पदाधिकारी आदी हजर होते.