पालघर : केंद्र शासनानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी पालघर जिल्ह्यात 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहिम 24 एप्रिल ते 1 मे या एका आठवड्याच्या कालावधीत देशभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्यानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना ( Kisan Credit Card ) किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) हे पिक उत्पादन, पशुपालन आणि मत्यव्यवसायासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डची माहिती देण्यासाठी, पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी आज पालघर जिल्ह्यातल्या बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये विशेष किसान ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पालघर जिल्ह्यातल्या नंडोरे मध्ये आज या संदर्भात विशेष किसान ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बँक ऑफ़ महाराष्ट्र, बँक ऑफ़ बरोदा आणि टीडीएस या तीन बँकानी एकत्रित येत आपल्या बँक अधिका-यांसोबत या ग्रामसभेत सहभाग घेतला. आणि उपस्थित शेतकर-यांना किसान क्रेडिट कार्ड बद्दलची माहिती दिली. या विशेष ग्रामसभेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी दिलेल्या नमुन्यातील अर्ज वाटप करण्यात आले. आणि ज्या शेतकर-यांनी आपली कागदपत्रे सोबत आणली होती त्यांचे याच ग्रामसभेत अर्ज बँकानी भरून घेतले. किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या एका आठवड्यात राबवण्यात येणा-या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकर-यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आणि पात्र लाभार्थ्यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून एक ते दिड महिन्यात किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बँक ऑफ़ बरोदा चे शाखा व्यवस्थापक यूवराज शिंदे यांनी दिली.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अपर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक यांना सर्व यंत्रणाच्या समन्वयानं मोहिम राबविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व संबंधित बँका किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन 1 मे पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची काम करणार आहेत. तसचं शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घ्यावा यासाठी 26 एप्रिलला गावनिहाय पीक विमा पाठशाळांचं आयोजन करण्यात येणार आहे.