पालघर : नैतिकता हे मानवी प्रगतीचे व्यवच्छेदक लक्षण असल्याने विधी व्यवसायासह इतर सर्व व्यवसायात व्यावसायिक नितिमत्ता अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस्. गडकरी यांनी केले. सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या पदवी वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना त्यांनी विधी शिक्षणातील अनेक पैलुंवर मार्मिक भाष्य केले. न्यायालयीन कामकाजा दरम्यान भाषा आणि शिष्टाचाराच्या वापराबद्दल त्यांनी विद्यार्थी आणि तरुण वकिलांना मार्गदर्शन केले. कायद्याच्या शिक्षणा दरम्यान कायदेशीर पद्धतीच्या मुलभूत गोष्टी शिकण्यासाठी ‘आर्ट ऑफ मुट कोर्ट’ शिकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शनिवार दि.२३ एप्रिलला सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयाच्या पदवी वितरण समारंभास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस्. गडकरी यांच्या बरोबरच ठाणे जिल्हयाचे जिल्हा न्यायाधिश ए.जे. मंत्री उपस्थित होते. ए.जे. मंत्री यांनी कायद्याच्या क्षेत्रात जर आपल्याला खऱ्या अर्थाने करिअर करावयाचे असेल तर विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जाणीवपूर्वक आपल्याला लावून घेतली पाहीजे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. आणि विधी क्षेत्रातील विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विधी महाविद्यालयाच्या प्रचार्या डॉ. पायल चोलेरा यांनी मागील दोन्ही शैक्षणिक वर्षातील १०० टक्के निकालाबाबत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या भविष्यातील वाटचालीचे सुतोवाच केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सामुहिक प्रयत्नाच्या आधारेच आपण यशाचे शिखर गाठू शकतो असे प्रतिपादन करताना कायद्याच्या पदवीधर विद्यार्थ्यांना या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
या पदवी प्रदान समारंभात संस्थेचे उपाध्यक्ष धनेश वर्तक, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर, सहसचिव जयंत दांडेकर, प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित होते. तसेच विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी पालघर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश डी. एच्. केळुस्कर, एस.एस. गुल्हाणे, एस. डी. दाभाडे, अ.ए.चांदके, श्री. वि. पी. खंडारे, अ.अ.काळे, एस.एच.तळेगावकर उपस्थित होते. याप्रसंगी विधी महाविद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांबरोबरच पालघर जिल्हयातील वकिल मोठया संख्येने उपस्थित होते.