पालघर : अनेक कारणानं सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना त्यांच्या पालघर मधल्या राहत्या घरात २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटककरण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप आणि त्यांच्या टीमनं सापळा रचून ही कारवाई केली.
शिक्षक बदलीसाठी केली होती पैशांची मागणी :
एका शिक्षकाची बदली करण्यासाठी लता सानप यांनी 50 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर त्यांनी 25 हजारांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार शिक्षकाला लाच द्यायची नसल्यानं त्यांनी तशी रीतसर तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे केली. लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळच्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सानप यांच्या घराच्या जवळपास सापळा रचला. आणि मग तक्रारदार शिक्षकाकडून २५ हजारांची लाच घेताना शिक्षणाधिकारी लता सानप यांना रंगेहाथ पकडण्यात आलं.
यावेळी एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले आणि एसीबी ठाणे परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी त्यांच्या पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोहवा/संजय सुतार, पोहवा/ नवनाथ भगत, पो.हवा/ पागधरे, पो.हवा/ अमित चव्हाण, पो.हवा/ विलास भोये, मपोहवा/ मांजरेकर, मपोना/ स्वाती तारवी चापोना/ सखाराम दोडे या टीम मधल्या सहका-यांच्या सहाय्याने सापळा रचून ही कारवाई केली.