पालघर : महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत पालघर पोलीस दलात महिला पोलीस अंमलदारांच्या निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसचं यावेळी पालघर पोलीस दलास डायल ११२, निर्भया पथकासाठी ५० नवीन मोटार सायकल, २ ईर्टिगा कार आणि १ बोलेरो जीप पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडुन प्राप्त झालेल्या निधीतुन ही वाहनं घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त पालघर पोलीस दलाकडुन पोलीस कोळगाव परेड ग्राऊंडवर परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ही वाहनं पालकमंत्र्यांच्या हस्ते पालघर पोलीस दलास देण्यात आली.
या कार्यक्रमा दरम्यान पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पालघर पोलीस घटकात महिला पोलीस अंमलदारांच्या निर्भया पथकाची स्थापना झाल्याचं जाहीर केलं. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे पथक स्थापन करण्यात आलेलं असून जिल्हयातल्या सर्व महिलांना हे पथक स्वत:चं माहेरघर वाटलं पाहिजे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पालघर पोलीस घटकात महिला अंमलदारांचे निर्भया पथक स्थापन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक शिंदे यांचं अभिनंदन केलं. आणि हे पथक पालघर पोलीस घटकामध्ये उत्कृष्ठरित्या कामकाज करून महिला संबंधिच्या गुन्हयास प्रतिबंध करेल अशी आशा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमास कृषी व माजीसैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, अपर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड, वरीष्ठ शासकीय अधिकारी आणि अंमलदार आदी उपस्थित होते.