पालघर : पालघर जिल्ह्यातल्या काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो अशा भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत, या मध्ये रस्ते आणि आवश्यक असेल तिथं पूल बांधणे गरजेचं असल्यामुळे त्या भागात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जिल्ह्यातला दुर्गम भाग मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार असल्याचं पर्यावरण पर्यटन, मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. वैतरणा नदीवरील सावर्डे ते दापोरा गावाना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचं लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आमदार सुनिल भुसारा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिह, कार्यकारी अभियंता माधवराव शंखपाळे आदी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातला बराचसा भाग हा दुर्गम असल्यामुळे दळण – वळणाचा मुख्य स्रोत असलेले रस्ते आणि पूल इथं उपलब्ध झाले नाहीत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार अशा दुर्गम भागांना मुख्य रस्त्यानं जोडले जाणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी बांधव, आणि स्थानिक नागरिक यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, असं ही ठाकरे यावेळी म्हणाले.