पालघर : पालघर जिल्ह्यात सकाळपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात आज एक दोन ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या दोन – तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्या मधल्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या राजीवली गावा मधल्या वाघराळपाडा या पाड्यातल्या एका घरावर डोंगराचा काही भाग कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या बाप – लेकीचा मृत्यू झाला आहे. तर आईला आणि मुलाला बचावकार्य करून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. आणि त्यांना उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे.
आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान डोंगराचा काही भाग खचून या घरावर कोसळला. आणि हे कुटुंब दरडी खाली दबलं गेलं होतं. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस दल आणि अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी बचाव कार्य करून या कुटुंबातल्या सर्व जणांना बाहेर काढलं. ज्यात 35 वर्षीय अमित ठाकूर आणि त्यांची 14 वर्षीय मुलगी रोशनी ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची 33 वर्षीय पत्नी वंदना ठाकूर आणि 10 वर्षीय मुलगा ओम ठाकूर या दोघांना बचाव कार्य करून वाचविण्यात यश आलं आहे.
तर दुसरीकडे आज सकाळी पालघर जिल्ह्यातल्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाघोबा खिंडीत दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवून वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.
भारतीय हवामान खात्याकडून 11 ते 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज देण्यात आला होता. आणि त्यामुळे पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून पालघर जिल्ह्यातल्या बोईसर, डहाणू, वाढवण, वरोर, पालघर, वसई – विरार सह जिल्ह्यातल्या इतर भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रात्रीपासून पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे कामा शिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.