पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या दोन – तीन दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या हमरापुर – गलतरे इथल्या आंब्याची मोरी पाण्याखाली गेल्यानं आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. नाणे, सांगे, गालतरे, गोरे, गुहिर, हमरापुर या गावांचा संपर्क तुटला असल्यानं विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. या मोरीची उंची कमी असल्यानं ही मोरी वारंवार पाण्याखाली जाऊन या गावांचा संपर्क तुटतो. मात्र तरी देखील प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप इथल्या स्थानिक गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अकलोली ते केलठण रोड वरील पुलावरून, हमरापूर ते गालतारे मधील पुलावरून पाणी वाहत असल्यानं हे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक बंद आहे. तसचं गौरपूर वनगा पाडा इथल्या 3 घरांत पाणी गेल्यानं त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. आणि नदीकाठी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या धामणी धरण क्षेत्रातल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत धामणी धरणाचे 1, 3, 5 क्रमांकाचे हे 3 दरवाजे उघडण्यात येणार असून पाण्याचा विसर्ग हा सुर्या नदीत करण्यात येणार आहे. तसचं पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याकडून 11 ते 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज देण्यात आला होता. आणि त्यामुळे पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून पालघर जिल्ह्यातल्या बोईसर, डहाणू, वाढवण, वरोर, पालघर, वसई – विरार सह जिल्ह्यातल्या इतर भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रात्रीपासून पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरीकांनी कामा शिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.