पालघर : बाप्पांचं आगमन सर्वत्र मोठ्या थाटात आणि जल्लोषात झालयं. सर्वत्र घराघरात, गल्लोगल्लीत, गावागावांत मोठ्या उत्साहात बाप्पांच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय. आपण सर्वजण बापांची मोठी भक्तिभावानं घराघरात आराधना करत असलो तरी पालघर जिल्ह्यात एक गाव असं आहे जिथे मागील 50 वर्षांपासून एक गाव, एक गणपती, एक मूर्ती ही लोकमान्य टिळकांची संकल्पना राबवली जातेय. यंदा ही या गावात मोठ्या जल्लोषात एक गाव एक गणपतीचं पन्नासावं सुवर्ण महोत्सवी वर्ष पार पडत आहे.
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात सुर्या नदीच्या तीरावर आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं आणि अडीच हजारांच्या घरात लोकसंख्या असलेलं उर्से हे गाव. या गावात 90 टक्के कुणबी आणि 10 टक्के आदिवासी समाजाची लोक राहतात. मात्र गावातला एकोपा आणि ऐक्य कायम अबाधित रहावं या उद्देशानं 1973 साली या गावातील नागरिकांनी एकत्र येत धनंजय कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना करून सार्वजनिक गौरी आणि गणेशोत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून या गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जातं आहे. इथं गणेशोत्सवासह प्रत्येक सण हा एक गाव एक उत्सव म्हणून साजरा केला जातो . विशेष म्हणजे या 50 वर्षात सार्वजनिक बाप्पांच्या एकमेव मूर्ती शिवाय कोणाच्याही घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जात नाही. त्यामुळे बाप्पांच्या आगमनानंतर पाच दिवस उर्से गावात नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. यंदा या गावात एक गाव एक गणपतीचं पन्नासावं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होतयं. या निमित्तानं गावात विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शताब्दी वर्ष ही आम्ही एक गाव एक गणपतीनेचं साजरं करू असा ठाम विश्वास इथल्या ग्रामस्थांकडून व्यक्त केला जातोय.
गणेशोत्सवासाठी लागणारा खर्च हा गावकरी गावातून लोकवर्गणी गोळा करून करतात . या गणेशोत्सवासाठी गावाबाहेरील कोणत्याही व्यक्तीची देणगी घेतली जात नाही. गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून उभारलेल्या सार्वजनिक हॉलमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. बाप्पांची मूर्ती बसवण्यासाठी केलं जाणारं सुरेख आणि आकर्षक असं डेकोरेशन ही गावातले तरुण एकत्र येऊन करतात. आणि मग विसर्जनानंतर बाप्पांच्या सजावटीसाठी आणलेल्या साहित्याचा गावात लिलाव केला जातो. यावेळी लहान लहान वस्तू घेण्यासाठी गावातले नागरिक चढाओढ करतात. या लिलावातून येणारा पैसा पुढील वर्षी गणेशोत्सवासाठी खर्च केला जातो. गणेशोत्सव हा सार्वजनिक असला तरी बाप्पांची मूर्ती विकत आणण्याचा मान हा गावातल्या दोनचं दांपत्यांना मिळतो. यासाठी ही एक विशेष प्रथा आहे. स्वखर्चानं बाप्पांची मूर्ती आणण्याची संधी मिळणाऱ्याला पाच दिवस बाप्पांची पूजा करण्याचा मान मिळतो. मात्र यासाठी गावातले सर्वजण उत्सुक असतात. त्यामुळे इच्छुक असलेल्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या उडवून लॉटरी पद्धतीनं ज्याच्या नावाची चिठ्ठी उचलली जाईल त्याला हा मान मिळतो. शिवाय एकदा एका दांपत्याला हा मान मिळाला की पुन्हा त्या दांपत्याला ही संधी नसते. त्यामुळे आत्तापर्यंत तरी या गावात मूर्ती विकत आणण्याचा मान हा इथल्या गावकऱ्यांना आयुष्यात एकदाच मिळतो .
गणेश चतुर्दशीच्या दिवशीचं नोकरीनिमित्त तसचं व्यवसायाकरता बाहेरगावी आणि शहरांमध्ये राहणारे गावातील नागरिक, तरुण आपल्या ऊर्से गावाकडे मोठ्या आवडीनं येतात. बाप्पांच्या आगमनानंतर पाच दिवस गावात मोठा उत्साह असून या दिवसांत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जातं. यावर्षी एक गाव एक गणपतीचं पन्नासावं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यानं यावेळी साठ वर्षे पूर्ण केलेल्या गावातल्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. गणेशोत्सवाप्रमाणेच गौरी उत्सव , नवरात्री उत्सव, होळी हे सर्व सण उर्से गावातले गावकरी एकत्र येत एक गाव एक उत्सव याप्रमाणे साजरे करतात . त्यामुळे पंचक्रोशीसह परिसरात उर्से गावाच होत असललं कौतुक ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं इथले तरुण मोठ्या गर्वानं सांगतात.
आपल्या बाप्पांची मूर्ती आणि सजावट आकर्षक आणि भव्य असावी यासाठी सुरू असलेली चढाओढ पण दिवसेंदिवस पाहतोयच. मात्र या चढाओढीत कुठेही भाग न घेता उर्से गाव आपली एक गाव एक गणपतीची ही परंपरा अविरतपणे पुढे घेऊन चाललयं. सार्वजनिक गणेशोत्सव ज्या उद्देशानं सुरू करण्यात आला तो उद्देश आजही डोळ्यासमोर कायम ठेवून उर्से गाव समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे.