पालघर : पालघर जिल्ह्यातल्या तारापूर मध्ये असलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्राहून ( Tarapur Atomic Power Station ) एक पिस्टल आणि जवळपास 30 जिवंत काडतुसांसह मनोज यादव नावाचा एक सी.आय.एस.एफ चा जवान ( CISF Constable) अचानक रहस्यमय प्रकारे फरार झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात या जवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी हा जवान ड्युटीवर तैनात होता. आणि दुपारपासून तो अचानक गायब झाला. सी.आई.एस.एफ अधिकाऱ्यांना वाटलं होतं की, हा जवान जवळपास कुठे गेला असेल, थोड्यावेळात परत येईल. मात्र बराच काळ उलटल्यानंतर जेव्हा हा जवान परत आला नाही तेव्हा त्याचा शोध घेण्यात आला. आणि त्यानंतर या जवानाची मिसिंगची तक्रार तारापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. मात्र रात्र उलटून ही हा जवान न सापडल्यानं त्याच्या विरुद्ध शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तारापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी योगेश जाधव यांनी माहिती देताना सांगितलं की, एक पिस्टल आणि 30 जिवंत काडतुसांसह सी.आई.एस.एफ एक जवान फरार झाला आहे. हा कॉन्स्टेबल 2 महिन्यांपूर्वी इथे कामावर लागला होता. गुरुवारी त्याने आपली संकेण्ड शिफ्ट असल्याचं सांगितलं. तो जवान दुपारनंतर न दिसल्यानं तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याची शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही. मग तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याची मिसिंग तक्रार तारापूर पोलीस ठाण्यात दिली. मात्र रातरभरात ही हा जवान मिळुन न आल्यानं शुक्रवारी सकाळी तारापूर पोलीस ठाण्यात या जवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.