पालघर : सागरी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या आठवड्यात जगभरात आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप दिवसाचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे यंदा पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि चिखले समुद्रकिनारी डहाणू कोसगार्डकडून आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय मिशन “स्वच्छता ही सेवा”, “आझादी का अमृत महोत्सव” आणि “पुनीत सागर अभियान” या अंतर्गत आज या आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं होतं.
प्लास्टिक मुक्त महासागर याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेत विविध केंद्र / राज्य सरकारचे अधिकारी, महापालिका, पोलीस, प्रा. कंपन्या, NCC/NSS, शालेय मुले, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट संस्था आणि मच्छीमार बांधव आदींना सहभागी करून घेण्यात आलं होतं. या स्वच्छता मोहिमेत डहाणू आणि चिखले या समुद्रकिना-यांवरुन प्लास्टिक बैग, खाली टीन्स, जाळे, रस्स्या, विविध खाद्यपदार्थांची फेकलेली आवरणे, बॉटल्स याप्रकारचा जवळपास 2000 किलो कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
सामान्य लोकांच्या मनात पर्यावरण संवर्धनाच्या सवयींची बीजे पेरणे आणि स्थानिक किनारी भाग / किनारे पूर्वस्थितीत राखणे हे आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप ड्राईव्हचं मुख्य उद्दिष्ट आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सरकारने भारताचे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय (MoES) आणि भारतीय तटरक्षक दल (ICG) यासारख्या आणि इतर सरकारी एजन्सींनी 75 दिवसांसाठी भारतीय किनारपट्टीवरील 75 किनारे स्वच्छ करण्याची योजना आखली होती. ज्याची सुरुवात 3 जुलै पासून झाली होती. आणि या मोहिमेचा समारोप आज झाला. आजची ही समुद्रकिनारे स्वच्छता मोहीम त्याच्याच एक भाग होती. या 75 दिवसांच्या कालावधीत डहाणू कोसगार्डकडून ( भारतीय तटरक्षक स्टेशन डहाणू ) स्थानिक समुद्रकिनारे स्वच्छता कार्यक्रम, स्थानिक गावांमध्ये वॉकथॉन / रॅली, विविध शाळा / महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, प्रश्नमंजुषा स्पर्धा, जनजागृती शिबिरे अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप मोहिमेत डहाणू कोसगार्ड स्टेशनचे कमांडिंग ऑफिसर बी.के.सिंह, डेप्युटी कमांडिंग ऑफिसर वी.आर.प्रकाश, डेप्युटी कमांडिंग ऑफिसर नेहा बारांगे, डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत, डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख, तारापुर टीएपीएसचे स्टेशन संचालक संजय मूलकालवर आदी सहभागी झाले होते.