पालघर : गाव आणि प्रशासन यातील महत्वाचा दुवा असलेला पोलीस पाटील यांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या जनसंवाद अभियाना अंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व पोलीस पाटीलांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यशाळेत जिल्ह्यातले जवळपास २४४ पोलीस पाटील हजर होते. यावेळी त्यांना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक इथले विधी निदेशक संजय पाटील यांनी पोलीस पाटील यांचे गावस्तरावर कोणती जबाबदारी असते, त्यांची कर्तव्ये काय असतात, ती कशाप्रकारे पार पाडायची अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं.
पालघर जिल्ह्यातल्या सर्व पोलीस पाटील यांच्यात एकसूत्रता येण्यासाठी आणि कोणताही प्रशासकीय अधिकारी गावामध्ये गेला असता पोलीस पाटील यांचं जनमाणसात वेगळेपण दिसून यावं तसचं सहज ओळखता यावं यासाठी या कार्यशाळेत पोलीस पाटीलांना निळ्या रंगाचे जॅकेट देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात प्रथमच पालघर पोलीसांकडून जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.