पालघर : सुदृढ बालकांच्या पालकांची जबाबदारी आता वाढली असून आपण आपल्या गावात पाड्यात इतर बालकांच्या मातांना देखील याबाबत मार्गदर्शन करावे कारण पालकांनी ठरवलं तरच त्यांचं बाळ सुदृढ होऊ शकते, त्यामुळे अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या सहकार्याने आपण देखील आपल्या परिसरातली बालके सुदृढ करून सामाजिक बांधिलकी निर्माण करू शकतो असं मत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केलं. पालघर पंचायती समिती सभागृहात पोषण माह अभियानाअंतर्गत आयोजित सुदृढ बालकांच्या आणि पालकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातल्या एकुण १३ प्रकल्पात ३१८२ अंगणवाडी केंद्र स्तरावर पोषण महा अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत अंगणवाडी स्तरावर विविध उपक्रमांव्दारे जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
या पोषण महा अभियाना अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प – पालघर कडून १३ विभागातल्या ३५४ अंगणवाडी केंद्रात स्वस्थ बालक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात बिट स्तरावरील प्रत्येक अंगणवाडीत केंद्रात ६ महिने ते ३ वर्ष आणि ३ ते ५ वर्षे वयोगटातील २ बालकांची स्वस्थ बालक आणि त्यांच्या पालकांची काळजीवाहू पालक म्हणून निवड करण्यात आली. या निवड करण्यात आलेल्या बालकांचा आणि त्यांचा पालकांचा अंगणवाडी स्तरावर लोकसहभागातून कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बिट स्तरावर निवड करण्यात आलेल्या २८ बालकांचा आणि त्यांच्या काळजीवाहू पालकांचा सत्कार मुख्यकार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण प्रवीण भावसार, पालघर गट विकास अधिकारी नरेंद्र रेंवडकर, बालविकास प्रकल्प अधिकारी- पालघर कल्पना पिंपळे, सुदृढ बालक आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.