पालघर : वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळावं या हेतूनं पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते आणि औषधांचा वापर सुरू झाला होता. मात्र त्यांच्या अतिवापरामुळे अन्नधान्य पिकांचे उत्पादनही कमीहोऊन जमीनी नापीक होऊ लागल्या आहेत, जमिनीचा पोत बिघडू लागला आहे, मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे, या दुष्चक्रातून बाहेर पडून शेती किफायतशीर होण्यासाठी आणि विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेती आवश्यक असल्याचं मत कृषितज्ञ तथा प्रगतिशील शेतकरी नरेश सावे यांनी व्यक्त केलं. कृषि विज्ञान केंद्रात आजपासून नैसर्गिक शेतीबाबत जागृती होण्यासाठी कृषि तंत्रज्ञान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी कृषीभूषण अनिल पाटील, पालघर कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विजय सागवेकर, एन बी मेहता कॉलेजच्या प्राचार्य तथा शाखा सचिव डॉ. अंजली कुलकर्णी, शेतकरी तसचं विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
नरेश सावे यांनी नैसर्गिक शेती तंत्रज्ञान या विषयी सविस्तर माहिती देताना त्यासाठी आवश्यक पाच घटक म्हणजे नांगरट, खते, पाणी, तण व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. “जीवो जीवस्य जीवनम्” हाच नैसर्गिक शेतीचा मूलमंत्र असल्याचे सांगून सर्वांनी नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार करावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. कृषि भूषण अनिल पाटील यांनी भात शेतीत यांत्रिकीकरण याबद्दल उत्कृष्ट सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती देत यांत्रिकीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. डॉ. विजय सागवेकर यांनी यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि कृषि विद्यापीठाच्या नैसर्गिक शेती विषयक प्रयोगाबाबत माहिती दिली. नैसर्गिकरित्या तयार झालेले पीक उत्पादन आरोग्याला हितकारक असल्याने ग्राहक आनंदाने खरेदी करतील, तसेच शाश्र्वत विकासासाठी नैसर्गिक शेती महत्वाची असल्याचे मत डॉ. अंजली कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले. यामध्ये त्यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची तसेच प्रक्षेत्रावर चालू असलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली. तसचं कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुपाली देशमुख तर आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञ भरत कुशारे, उत्तम सहाणे, अनिलकुमार सिंग, प्रशांत वराठा, दामिनी तांडेल यांनी विशेष मेहनत घेतली.