नाशिक : नाशिक शहरात आज पहाटे नांदुर नाका इथं एका खासगी प्रवासी बस आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात खासगी प्रवासी पेटल्यानं 12 जणांचा होरपळुन मृत्यु झाला तर 37 जण जखमी झाले आहेत. ही खासगी बस यवतमाळ इथून मुंबईकड़े येत असताना आज सकाळी हा भीषण अपघात झाला. प्रवासी गाळ झोपेत असल्यानं काहींना बस बाहेर निघता आलं नाही आणि त्यामुळे ते आगीच्या कचाटयात सापडून त्यांचा मृत्यु झाला. तर काही प्रवासी बस बाहेर पडल्यानं ते बचावले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बस मध्ये जवळपास 53 प्रवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.
या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यांचंप्रमाणे मृतांच्या वारसांना केंद्र शासनाकडून दोन लाख रुपयांची आणि जखमींना 50 हजार रुपयांची तर राज्याकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्याची पाहणी त्याचबरोबर घटनास्थळाची पाहणी देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही दुःख व्यक्त केलं आहे.