पालघर : १ ऑगस्ट २०१४ ला ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून वेगळं करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. सन २०१४ पासून आतापर्यंत पालघर जिल्हा पोलीस दलासाठी वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आलेली नव्हती. मात्र दिवसेदिवस पालघर जिल्ह्यातली वाढती वाहतूक कोंडी पाहता आणि रस्ते अपघातावर नियंत्रण करण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आता स्वतंत्र वाहतूक शाखेची निर्मिती केली आहे. या स्वतंत्र वाहतूक शाखेचं उद्घाटन नुकतंच पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
वाहतूक शाखेसाठी सहायक पोलीस निरीक्षक आसिफ बेग यांच्यासह सुमारे ५३ पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक शाखेसाठी नेमणूक करण्यात आलेले प्रभारी अधिकारी आसिफ बेग यांच्यासह ३२ पोलीस अंमलदारांचं ०७ दिवसांचं वाहतूकीचं प्रशिक्षण देण्यात आलं असून उर्वरीत २१ पोलीस अंमलदारांचं प्रशिक्षण हे लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे. या स्वतंत्र वाहतूक शाखेचं प्रत्यक्षात कामकाज हे आगामी ग्रामपंचायत निवडणूकीनंतर सुरू करण्यात येणार आहे.