पालघर : युवक बिरादरी भारत या संस्थेमार्फत औरंगाबाद इथं राज्यस्तरीय नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी इशा ठाकूर, उत्कर्षा म्हात्रे, शिवम सिंग, नेहा प्रजापती हे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी शिबिरात आयोजित करण्यात आलेल्या वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच यावेळी ईशा ठाकूर आणि नेहा प्रजापती यांना उत्कृष्ट महिला शिबिरार्थी म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या शिबिरात महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागील वर्षी सुद्धा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून ‘युवा संसद’ स्पर्धेत विशेष पारितोषिक मिळाले होते. या संघाचे शिक्षक प्रतिनिधित्व प्रा. मिताली संखे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रोहित गायकवाड, प्रा.राजू तांडेल, प्रा. भूषण भोईर, प्रा. विवेक कुडू यांनी विद्यार्थ्यांना या शिबिरात जाण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना मार्गदर्शन केले.