पालघर : आपले हात जर स्वच्छ नसतील तर त्यातून आपण अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. आपल्या आसपास अनेक सूक्ष्म जीवाणु असतात. काही काम करत असताना ते आपल्या हाताला नकळत चिटकले जातात. त्यामुळे अन्न खाण्यापूर्वी आपण जर आपले हात स्वच्छ धुतले नाहीत तर हेच जीवाणु आपल्या पोटात जातात. आणि मग आपण आजारी पडतो. त्यामुळे नेहमी हात धूणे मानवी जिवनातील महत्वाची गोष्ट आहे. २००८ पासून देशात सर्वत्र 15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना (Theme) Unite for Universal Hand Hygiene ही असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यामध्ये हातांच्या स्वच्छतेने महत्वाची भूमिका बजावली आहे.
स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय यांच्या माध्यमातून भारत सरकारने स्वच्छतेला प्राधान्य दिलं आहे. शाळास्तरावर देखील शालेय विद्यार्थ्यांमध्येही साबणानं हात धुण्याची सवय रुजावी याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे याच जागतिक हात धुवा दिनानिमित्त ( Global Hand washing Day ) आज जिल्ह्यात विविध अंगणवाडी केंद्रात स्वच्छते बाबतच्या विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
पालघर मधल्या खानपाडा या अंगणवाडी केंद्रात आज लहान मुलांना, त्यांच्या पालकांना आणि आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना गाण्याच्या आणि प्रात्यक्षिकाद्वारे हात धुण्याचे महत्त्व इथल्या अंगणवाडी सेविका कल्पना अघाव यांनी समजावून सांगितले. त्यांनी मुलांना कृतिच्या माध्यमातून हात कोणत्या पद्धतीने धुवावेत याचं प्रात्यक्षिक देखील करून दाखवलं. तसचं हात का धुवावावेत, कधी धुवावेत, त्याचे फायदे काय आदी सर्व माहिती त्यांनी मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजावून सांगितली. यावेळी मुलांनी देखील सांगितल्याप्रमाणे गाणं गात आपले हात धुवून आजचा जागतिक हात धुवा दिन साजरा केला.