पालघर : विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे, शहरात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, लायन्स क्लब ऑफ पालघर, पालघर मेडीकल प्रॅक्टीशर्न्स असोसिएशन, पालघर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर शहरात महात्मा गांधी जयंती निमित्ताने पालघर शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पालघर मधील पालघर रेल्वे स्टेशन ते चार रस्ता, पालघर रेल्वे स्टेशन ते कमला पार्क, हुतात्मा स्मारक ते बी.एस.एन.ल. ऑफीस, हुतात्मा स्मारक ते पंचायत समिती कार्यालय हा परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला.
राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना मुली आणि मुले, दूर व निरंतर शिक्षण या उपक्रमातील तसेच बी.एम.एस., बॅफ, बीबीआय, आय.टी., सी.एस. या वर्गांचे विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले. महाविद्यालयातून १००० विद्यार्थी आणि १२० शिक्षक आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत आपले योगदान दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अतुल दांडेकर आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी यांचे मार्गदर्शन या उपक्रमास लाभले.
या अभियानाचे समन्वयक उपप्राचार्य प्रा. महेश देशमुख, प्रा. विवेक कुडू होते. या अभियानाच्या बरोबरच प्लास्टीक विरोधी अभियान शहरात वर्षभर सुरु ठेवण्याचा संकल्प लायन्स क्लब आणि महाविद्यालयाच्या एन.सी.सी, एन.एस.एस. आणि डी.एल.एल.इ. यांनी केला आहे. या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांना शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.