पालघर : नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउदयोजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्ट-अप यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ही स्टार्ट-अप यात्रा आज पालघर जिल्ह्यात दाखल झाली. महाराष्ट्र स्टार्ट-अप यात्रेच्या अनुषंगाने आज पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.
नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते पण काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. त्यामुळे जिल्हयातल्या नागरीकांच्या, विद्यार्थ्यांच्या नवनवीन नाविन्यपूर्ण संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशानं या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे.
या महाराष्ट्र स्टार्ट-अप यात्रेच्या दुस-या टप्प्यात आज जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्र शिबिरात जवळपास २७ जणांनी ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून सहभाग घेतला होता. त्यापैकी १७ जणांनी या शिबिरात स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय, कृषि, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी,स्वच्छ उर्जा आदी.), ई प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा व गतिशीलता आणि इतर कोणतेही क्षेत्र अशा विविध क्षेत्रातल्या आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर केलं. त्यानंतर त्यातून जिल्हास्तरावरील 3 उत्कृष्ट जणांना प्रत्येकी 25,000, 15,000 आणि 10,000 रूपये याप्रमाणे पारितोषिकं देण्यात आली.
तसचं या प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उदयोजकते बाबतचे माहितीपर सत्र, स्थानिक उदयोजकांची व्याख्याने, तज्ञ मार्गदर्शक आणि सल्लागारांची सत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता जिल्हा स्तरावर आज निवड झालेले हे 3 विजेते येत्या 17 ओक्टोबरला राजभवनात होणा-या राज्यस्तरीय सादरीकरण सत्रात पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत.