पालघर : दिवाळी म्हणजे दिव्यांच्या उत्सव. दिवे, पणत्या आणि आकाश कंदील यांना या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी जवळ आल्यानं दिवाळीसाठी लागणारं साहित्य घेण्यासाठी सर्वांची पावलं ही बाजारपेठेकडे वळू लागलीत. अशातच पालघर जिल्ह्यातल्या दांडेकरपाडा आणि डोवलीपाडा या गावातल्या महिला सध्या अतिशय बारीक काम, सुंदर रंगसंगती आणि नक्षीकाम असलेले आकाश कंदील बनवण्यात व्यस्त आहेत.
पालघर जिल्ह्यात सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी तसचं गरुजू आदिवासी महिलांना त्यांचं घर सांभाळून गावातचं काही रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. याचं सेवा विवेक संस्थेनं दांडेकरपाडा आणि डोवलीपाडा या गावातल्या जवळपास 41 महिलांना महिनाभर बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण दिलं. आणि मग या गावातल्या महिला आता दिवाळीच्या सणासाठी बांबूपासून सुंदर आणि अतिशय बारीक काम असलेले असे आकाशकंदील बनवू लागल्या आहेत.
या बांबूच्या आकाश कंदीलांचं वैशिष्ट्ये असं की, हे आकाश कंदील पर्यावरणपूरक असून स्वदेशी आहेत. यंदा या महिलांनी जवळपास सात प्रकारचे कंदील बनवले असून त्यांना बुध, गुरू, शुक्र, ध्रुव, सप्तरशी, हर्षल, मंगळ या सात ग्रहांची नावं देण्यात आली आहेत. यातल्या मंगळ या आकाश कंदिलाला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. हे कंदील तयार करण्यासाठी मानवेल आणि मेस या दोन प्रकारच्या जातीच्या बांबूचा वापर करण्यात येतो. कंदीलांना नैसर्गिक रंग देण्यासाठी रांगोळीच्या रंगाचा वापर केला जातो.
या महिलांनी बनवलेल्या बांबूच्या पर्यावरणपूरक अशा आकाश कंदीलांना केवळ भारताच नव्हे तर प्रदेशात ही मोठी मागणी आहे. आतापर्यंत मुबंई शहरासह गुजरात, केरळ, कर्नाटक, बंगलौर अशा भारतातल्या विविध राज्यांत तसचं अमेरिका, दुबई आणि युरोपातल्या 7 देशांमध्ये हे कंदील विक्रीसाठी गेले आहेत. बाजारात हे आकाश कंदील 370 रुपयांपासून ते 999 रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या संस्थेच्या माध्यमातून विविध गावांत बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी जवळपास ४००० कंदील बनवले आहेत. त्यातल्या 70 टक्के आकाश कंदीलांची यशस्वीरित्या विक्री पूर्ण झाली असल्याची माहिती सेवा विवेक संस्थेच्या प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर यांनी यावेळी दिली. बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण घेतल्यानं आता या महिला आपली घरची आणि शेतीची कामं आटपुन उरलेल्या वेळेत हे आकाश कंदील बनवतात. या कामातून गावातचं घरबसल्या रोजगार उपलब्ध होत असल्यानं या महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे.