पालघर : टोकियो (Tokyo) येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील तीनही विजेत्या स्पर्धकांवर मात करत रुद्रांक्ष पाटीलने सुवर्णपदकाला गवसणी घातली. रुद्रांक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि वाशी येथील आरटीओ विभागात उपायुक्त असलेल्या हेमांगिनी पाटील या दाम्पत्यांचा मोठा मुलगा आहे.
रुद्रांक्ष पाटीलने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या अचूक कामगिरीच्या जोरावर स्वतःचे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याने आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत एकूण 20 सुवर्ण, 12 रौप्य आणि 07 रजत पदकं मिळवली आहेत. रुद्रांक्ष पाटीलने खेलो इंडिया युथ स्पर्धा 2020 मध्ये सुवर्णपदक मिळवले असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने 8 सुवर्ण, 3 रौप्य पदके मिळवत स्वतःला सिद्ध केले आहे.
रुद्रांक्ष पाटील (Rudranksh Patil) सध्या सीनियर वर्ल्ड रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर असून ज्युनियर वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या नंबरवर आहे. कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत रुद्रांक्ष पाटील याने सुवर्णपदक पटकावलं होतं. 2024 ला फ्रान्स मध्ये होणार्या ऑलम्पिक स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक :
दरम्यान नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने 30 सप्टेंबर रोजी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला होता. त्याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांक्षने फायनलमध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली.