पालघर : महावितरणच्या पालघर विभागीय कार्यालयाकडून जिल्ह्यात वीज चोरांविरुध्द धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात पालघर, बोईसर-ग्रामीण, सफाळे, तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, बोईसर (औद्योगिक) या उपविभागांमध्ये जवळपास १०२४ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात १६३ ठिकाणी वीज चोरी होत असल्याचं तसचं ११ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचं उघडकीस आलं.
दोन दिवसांच्या या धडक मोहिमेत २५ लाख रुपये किंमतीची पावणे दोन लाख युनिट विजेची चोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकांना यश आलं. वीज चोरीची अनुमानित वीजबिलं संबंधित ग्राहकांना देण्यात आली असून या देयकासह दंडाची रक्कम दिलेल्या मुदतीत न भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्यासाठी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात येईल.
वीजचोरी शोध मोहीम यापुढे नियमितपणे राबविण्यात येणार असून आगामी काळात ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये तसचं अधिकृत वीजजोडणी घेण्याचं आवाहन महावितरणने केलं आहे.