पालघर : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मध्ये जव्हार – सिलवासा रोडवर आज सकाळी प्रवाश्यांनी भरलेल्या दोन एसटी बस एकमेकांना समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसमध्ये असलेले सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले. तसचं जळगाव – सिलवासा एसटी बसचा चालक हा गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचारकरून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान ST क्रं. MH 20 BL4095 सिलवासहुन नाशिकला जात असताना आणि ST क्रं MH 14 BT 4895 जळगावहुन सिलवासला येत असताना भरधाव वेगात असलेल्या या दोन्ही एसटी बस जामसर फाटा इथल्या धोकादायक वळणावर एकमेकांना समोरासमोर धडकल्या आणि त्यामुळे हा अपघात झाला. यावेळी बस मध्ये जवळपास 80 प्रवासी प्रवास करत होते. जखमी प्रवाश्यांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोन्ही एसटी बस चालकांविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी दिली आहे.