पालघर : त्रिपुरारी पौर्णिमेला ‘त्रिपुरी पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची तीन पुरे जाळून त्याला ठार केले होते. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली घडली. त्यामुळे कार्तिक पौर्णिमा प्रदोषकाली असेल त्या पौर्णिमेला ‘त्रिपुरारी’ किंवा ‘त्रिपुरी’ पौर्णिमा असे नाव मिळाले. त्या दिवसापासून लोकं दर कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाली दीपोत्सव करून त्रिपुरसंहाराचा आनंद व्यक्त करू लागले.
या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात दिवे लावावेत, दीपदान करावे, गंगास्नान करावे आणि कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यावे असा विधी आहे. निरनिराळ्या देवस्थानात ज्या दगडी दीपमाळा असतात, त्याही या दिवशी दिवे लावून पाजळतात. या दीपोत्सवाला त्रिपुर पाजळणे असे ही म्हणतात.
पालघर जिल्ह्यातल्या केळवे इथल्या सुप्रसिद्ध शितलादेवीच्या मंदिरात सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळीच्या निमित्तानं संपूर्ण मंदिरात आणि मंदिराच्या परिसरात 5 हजारांहून अधिक दिवे लावून विलोभनीय आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे हा दीपोत्सव लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरला. रात्रीच्यावेळी ही सुंदर रोषणाई पाहण्यासाठी मंदिरात नागरिकांची मोठी दाटी दिसून आली.
केळवे गावातल्या मुधकर इनामदार यांनी या परंपरेला सुरुवात केली होती. आणि गेल्या 53 वर्षांपासून या कुटुंबियांनी ही परंपरा अखंड सुरू ठेवली आहे. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हा दीपोत्सव करण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे यंदा ही गावकरी आणि इनामदार कुटुंबियांनी शितलादेवी च्या मंदिरात 5 हजारांहुन अधिक दिवे लावून आकर्षक अशी रोषणाई केली होती.या असंख्य दिव्यांमुळे शितलादेवी मातेचे मंदिर अगदी विलोभनीय दिसत होतं.