पालघर : पालघर जिल्ह्यातल्या शेवटच्या प्रत्येक पाड्यापर्यंत आम्हाला कनेक्टिव्हिटी न्यायची आहे, आणि विशेषतः आम्हाला पालघर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे पूर्ण पणे कनेक्ट करायचे आहेत त्या दृष्टीनं येत्या काळात आम्ही काम करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. बिरसा मुंडा यांच्या जयंती तसचं राष्ट्रीय जनजाती गौरव दिनानिमित्त आज जनजाती विकास मंचाकडून पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मधल्या राजीव गांधी स्टेडियम मध्ये आदिवासी संस्कृतीच्या वारसदारांच्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी 40 आदिवासी समाजाच्या वारसदारांचा सत्कार उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम,अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्रंजी चव्हाण, आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप धुर्वे आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी एक महत्वाचं काम केलं आहे, ते म्हणजे देशभरातून 75 आदिवासी नायक शोधून काढले, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य साठी, आपल्या संस्कृतीसाठी बलिदान दिलं त्या सर्वांचा इतिहास पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी तो पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले.
आदिवासी मुलांना हॉस्टेल मध्ये जागा मिळत नाही त्यावेळी आदिवासी मुलांना शिक्षण सोडावं लागत, त्यामुळे एक ही आदिवासी मुलगा शिक्षणाविना वंचीत राहू नये म्हणून ज्या मुलांना हॉस्टेल मध्ये जागा मिळाली नाही त्यांना वर्षाला 60 हजार रुपये देऊन खाजगी ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आपण केला. माझ्या मुख्यमंत्री काळात पेसा कायदा लागू करण्यासारखे अनेक महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतले. येत्या काळात महाराष्ट्रात जनजाती आयोग निश्चितपणे तयार करून त्या माध्यमातून आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित आदिवासी बांधवाना दिलं.
TRTI या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांचा पीएचडी हा प्रश्न सोडवला जाईल, आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी TRTI माध्यमातून अनुदान दिलं जाणार असल्याचं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं. तसचं जे विद्यार्थी आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी संशोधन करतील अशा प्रत्येकाचा पूर्ण खर्च हा TRTI च्या माध्यमातून उचलला जाईल असं ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यात मेडिकल कॉलेजे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचं काम लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन ही त्यांनी यावेळी पालघर करणांना दिलं.